साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील ‘मिल के चलो’ असोसिएशन सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यानिमित्त अमळनेर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जळगाव येथील नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारची विज्ञान शिक्षण संस्था आयसर (IISER), पुणे येथील संस्थापक शास्त्रज्ञ डॉ.अरविंद नातू होते.
कार्यशाळेत ‘विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी’ यावर डॉ.नातू यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. जयदीप पाटील यांनी शिक्षकांना नोबेल पारितोषिक मिळविणारे मुले कसे घडविता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. ‘मिल के चलो’ असोसिएशनचे संस्थापक अनिरुध्द पाटील, कल्याणी पाटील यांनी संस्था नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन दिले.
यानिमित्त निवडक मुलांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात प्रामुख्याने नंदगाव, पिंगळवाडे, गडखांब, देवगाव-देवळी येथील जि.प.शाळांचे विद्यार्थी आणि वावडे येथील बी.बी.ठाकरे हायस्कूलचे विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धा आणि प्रदर्शनात विजयी मुलांना डॉ.अरविंद नातू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेमा होनवाड यांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ‘मिल के चलो’ संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक यांनी अनुभव कथन केले. सकाळ सत्रातील सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक दत्तात्रय सोनवणे, चंद्रकांत पाटील यांनी केले.
विज्ञान मंडळातर्फे डॉ.अरविंद नातू यांचा सत्कार
कार्यक्रमात अमळनेर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष डी.के.पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, एस.डी.देशमुख, आर.एस.पाटील, जी.डी.पाटील, प्रमिला अडकमोल, भाग्यश्री वानखेडे यांनी विज्ञान मंडळातर्फे डॉ.अरविंद नातू यांचा सत्कार केला. यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य सिद्धार्थ पाटील, प्राजक्ता पाटील, प्रा.विनायक पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, प्रिया ठाकरे, गोपाल गावंडे, सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार तथा मार्गदर्शक निरंजन पेंढारे, उमेश काटे तर आभार संस्थेचे संचालक प्रकाश पाटील, करुणा पाटील यांनी मानले.