लाच प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अटकेत
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी :
भुसावळ शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) त्याच्या खाजगी पंटरला एसीबीने रंगेहात पकडले आहे.
या प्रकरणात राजू सांगळे आणि त्याचा खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील तक्रारदाराला अटक न करता फक्त प्रतिबंधात्मक (चॅप्टर) कारवाई करून प्रकरण मिटवण्यासाठी PSI राजू सांगळे यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), महाराष्ट्रकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने २९ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. त्यानंतर PSI सांगळे यांनी आपल्या खाजगी पंटरच्या माध्यमातून तडजोड करून लाच रक्कम २० हजार रुपयांवर आणली होती.
ठरल्याप्रमाणे पंटर सलीम हकीम कुरेशी याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची मागणी करताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्याला जागीच ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही रक्कम PSI राजू सांगळे यांच्या सांगण्यावरूनच घेत असल्याची कबुली दिली. त्यानंतर तात्काळ कारवाई करत अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली.
या कारवाईनंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ACB कडून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील एसीबीच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
