वारंवार वीज ट्रिपिंगने उद्योजक संतप्त; “कंपन्या बंद करा, नुकसानभरपाई द्या”
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
उमाळा-नशिराबाद परिसरातील औद्योगिक कंपन्यांना वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगचा मोठा फटका बसत असून, त्यामुळे उत्पादन प्रक्रियेसह संपूर्ण उद्योग व्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. दर तासाला होणाऱ्या वीज खंडितामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी कंपन्या बंद ठेवत चिंचोली सबस्टेशनवर तीव्र आंदोलन करून महावितरणविरोधात जोरदार निषेध नोंदविला. तसेच, “अशीच परिस्थिती राहणार असेल तर वीज कनेक्शनच कट करा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्या,” अशी आक्रमक मागणी उद्योजकांनी केली आहे.
उमाळा-नशिराबाद रोड परिसरातील सुमारे २५ विविध प्रकारच्या कंपन्यांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने वीज ट्रिपिंगचा सामना करावा लागत आहे. मिनिटा-मिनिटाला होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे मशीनरी बंद पडणे, उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे आणि कच्चा माल खराब होणे, अशा गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
उद्योजकांच्या मते, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मशीनची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत आहे. विशेषतः प्रोसेसिंग युनिटमधील हीटिंग सिस्टीम विस्कळीत होत असल्याने विजेचा वापर वाढून बिलही अधिक येत आहे. त्यातच उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने कंपन्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
एमआयडीसी परिसराच्या तुलनेत या भागातील उत्पादन खर्च प्रति युनिट तब्बल तीन रुपयांनी अधिक पडत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला. वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे उत्पादन घटत असताना कामगारांचे पगार, बँकांचे कर्ज, व्याज आणि इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. परिणामी सुमारे ६०० कामगारांच्या रोजगारावर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर बाबही आंदोलनादरम्यान मांडण्यात आली.
वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे चांगल्या प्रतीचा कच्चा माल खराब होऊन तो भंगाराच्या भावात विकण्याची वेळ येत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. या सततच्या नुकसानीमुळे बँकांचे हप्ते आणि व्याज वेळेत भरता येत नसल्याने आर्थिक ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी निवेदनाद्वारे महावितरणवर गंभीर आरोप करत, “उद्योजकांना कोणतेही ठोस सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आमच्या कंपन्या, मशिनरी आणि जागेची किंमत ठरवून शासनाने ती विकत घ्यावी किंवा आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी,” अशी मागणी केली.
या आंदोलनात उद्योजक मुकेश दहाड, हरीश जोशी, मनोज मित्तल, निकूज बियाणी, महेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
