महापौर दीपमाला काळे यांची पाहणी, दर्जेदार कामाचे स्पष्ट निर्देश
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील रामदास कॉलनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उद्यानाच्या विकासकामांना गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देत सविस्तर पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
परिसरातील नागरिकांना आधुनिक, स्वच्छ आणि सुस्थितीत विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उद्यानाचा विकास करण्यात येत असून, कामांच्या प्रगतीबाबत महापौरांनी जागेवर जाऊन प्रत्येक घटकाची बारकाईने तपासणी केली. कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या गरजांचा विचार करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधील स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक नितीन बरडे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे आणि अनिल अडकमोल यांनी परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
रामदास कॉलनी येथे उभारण्यात येणाऱ्या या उद्यानात चोहोबाजूंनी प्रभावी प्रकाश व्यवस्था, तसेच नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. पर्यावरणपूरक आणि आकर्षक उद्यान विकसित करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभागाचे संदीप मोरे, पाणीपुरवठा विभागाचे घृष्णेश्वर साळुंखे, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील तसेच संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांनीही पाहणीदरम्यान सहभाग घेतला. सर्व विभागांनी समन्वय राखून काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले की, हे उद्यान केवळ सौंदर्यीकरणाचा प्रकल्प नसून नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती क्षेत्र आणि कुटुंबांसाठी सुरक्षित विरंगुळा उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रामदास कॉलनी परिसरातील हरित क्षेत्रात वाढ होऊन पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
