कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण-उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी यांचा कालावधी लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हे आदेश १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी हे आदेश जारी केले असून, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनापरवानगी सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हा आदेश शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, विवाह सोहळे तसेच अंत्ययात्रा यांना लागू राहणार नाही. तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
