जळगाव : प्रतिनिधी : ”जितके डावलतील, तितके ते लोकांच्या मनात शिरतील”; नवी मुंबईतील फलक वादावरून मुख्यमंत्र्यांची पाठराखण
विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर; कर्जमाफीवरून दिला कडक इशारा
“प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ही भावना असणे स्वाभाविक आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की ‘देवाभाऊंचे’ (देवेंद्र फडणवीस) दिल्लीत प्रमोशन व्हावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीच धुरा सांभाळावी,” असे अत्यंत स्फोटक आणि सूचक वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. सत्तेत सहभागी असूनही बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजप आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
भंडारा येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि महायुतीमधील अंतर्गत वादावर थेट आणि रोखठोक भाष्य केले.
विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; शेतकरी आत्महत्येवरून घेरले
विदर्भाला उपमुख्यमंत्री (माजी मुख्यमंत्री) लाभले असतानाही येथील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलेली नाही, यावर बोट ठेवत बच्चू कडू म्हणाले, “विदर्भातील नेते सत्तेत सर्वोच्च पदावर असतानाही आज रोज १० ते १५ शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांकडून (देवेंद्र फडणवीस) येथील जनतेला ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत.” पुढे बोलताना त्यांनी, “नदीजोड प्रकल्पातून पाणी जेव्हा यायचे तेव्हा येईल, पण आजच्या घडीला शेतकऱ्याला तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. कर्जमाफीच्या नावाखाली जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तर ती अजिबात खपवून घेणार नाही,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.
…तर एकनाथ शिंदे लोकांच्या मनात शिरतील!
नवी मुंबई येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. “एकनाथ शिंदे यांना तुम्ही जितके डावलण्याचा प्रयत्न कराल, तितके ते लोकांच्या मनात अधिक घट्ट शिरतील. तुम्ही त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर लिहा किंवा लिहू नका, एकनाथ शिंदे हे लोकांच्या मनातील नेते आहेत,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.
’विदर्भच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल!’
पुढील राजकीय गणितांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आम्ही स्वबळावर लढणार की कसे, हे अजून ठरलेले नाही. मात्र, शांत आणि सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचेच, हा आमचा निर्धार आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत मी विदर्भाचा व्यापक दौरा केला असून केवळ ४ दिवसांत २० सभा घेतल्या आहेत. लोकांशी बोलल्यानंतर मला खात्री पटली आहे की, हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवेल.” त्यांच्या या विधानामुळे महायुतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
