४ लाख ७ हजार बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या २८ जून 2026 रोजी देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातही या मोहिमेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच माता व बाल संगोपन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मोहिमेचे नियोजन, मनुष्यबळ वाटप आणि अंमलबजावणी याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्र मिळून एकूण ४ लाख ७ हजार ९७८ बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ३ हजार १५० पोलिओ बूथ उभारण्यात येणार असून २ हजार ९२६ आयपीपीआय पथके, ६४९ मोबाईल पथके आणि १३१ ट्रान्झिट पथके तैनात राहणार आहेत.
मोहिमेच्या दिवशी प्रत्येक बूथवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येतील. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना लसीकरण करणार आहेत. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
बैठकीत भारताच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेतील ऐतिहासिक यशाचाही उल्लेख करण्यात आला. सातत्याने राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे २०११ नंतर देशात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. २०१४ मध्ये भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला होता.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि सीईओ करिश्मा नायर यांनी पालकांना आवाहन करत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पोलिओमुक्त जिल्ह्याची स्थिती कायम ठेवण्यासाठी सर्व पालकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
