तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक वॉच; रात्री होणार अचानक तपासणी
साईमत भुसावळ प्रतिनिधी :
शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भुसावळ पोलिसांनी आता विशेष आणि कडक मोहीम हाती घेतली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार पुन्हा शहरात प्रवेश करत असल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या गस्तीदरम्यान तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन ते शहरात उपस्थित आहेत का, याची प्रत्यक्ष खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातून एक ते दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या काही गुन्हेगारांकडून नियमभंग होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे गुन्हेगार गुपचूप शहरात प्रवेश करून पुन्हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याच्या तक्रारी आणि संशय पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तडीपार गुन्हेगारांची अद्ययावत यादी तयार केली असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत सतत दक्ष राहण्याचे आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तडीपार आदेशाचे उल्लंघन करताना जे कोणी गुन्हेगार आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र स्वरूपात राबवली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
