इच्छादेवी चौफुलीवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरोधात पोलिसांची धडक कारवाई
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील इच्छादेवी चौफुली येथे बुधवारी (दि. १९) मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कारवाईत वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी मोरेश्वर पेंडाम यांच्यासह पोलिसांचे पथक यावेळी तैनात होते.
या मोहिमेदरम्यान वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एका वाहनचालकाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. तपासणीच्या नोंदीनुसार सुनील रामप्रकाश यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १००.८ मिलीग्रॅम प्रति १०० मिलीलीटर इतके नोंदविण्यात आले. संबंधित वाहनाचा क्रमांक एमएच १९ ईएक्स १९६३ असून, तपासणी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी करण्यात आली.
शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांवर लक्ष ठेवून नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे.
दरम्यान, मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवू नये. स्वतःच्या तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.
