साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव तालुक्यातील खेडी, कानळदा आणि परिसरातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थेट घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. विशेष म्हणजे, पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली असतानाही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून प्रवास करत थेट नदीपात्र गाठल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
नागरिकांशी साधला थेट संवाद
खेडी व कानळदा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संबंधित गावांमध्ये पोहोचून स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांकडून वाळू उपसा व वाहतुकीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट गिरणा नदीपात्रात उतरून पाहणी केली.
संबंधित यंत्रणेची कानउघडणी; कारवाईचे कडक निर्देश
अवैध वाळू वाहतुकीला आणि उपशास कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. महसूल व पोलीस यंत्रणेने समन्वयाने काम करून वाळू माफियांचा बंदोबस्त करावा, अशा कडक सूचना यावेळी देण्यात आल्या.
साठवलेला वाळूसाठा जप्त; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
दरम्यान, या धडक पाहणीनंतर जळगाव तहसीलदारांच्या पथकाने तातडीने कारवाई करत काही ठिकाणी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोषींवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांनी स्वतः दुचाकीवरून जाऊन केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपशाविरोधातील मोहिमेला आता मोठा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
