इतर चोऱ्यांमधील सहभागावरून गावात चर्चांना उधाण
साईमत -खिर्डी- प्रतिनिधी |
रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथून चोरीस गेलेली दुचाकी उघडकीस आणण्यात निंभोरा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी गावातील माजी सरपंच संशयित आरोपी किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिर्डी बुद्रुक येथील हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांनी २९ जुलै २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आपली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH 19 EX 2679) घरासमोर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जागेवर न दिसल्याने चोरी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निंभोरा पोलिसांनी संशयित किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी (रा. खिर्डी बु.) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेली ७० हजारांची दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली.
दरम्यान, खिर्डी बुद्रुक गावात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा माजी सरपंच असल्याने या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावातील इतर चोऱ्यांमध्येही या संशयिताचा सहभाग आहे का, यादृष्टीने पोलीस सखोल तपास करत असून, लवकरच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोहेकॉ किरण चाटे, पोकॉ सुभाष शिंदे व पोकॉ सरफराज तडवी यांच्या पथकाने केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
