साईमत -रावेर- प्रतिनिधी |
तालुक्यातील आमोदा परिसरात बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात रावेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शुक्रवारी धडक कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर संशयित गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडी व सुरे जप्त केले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा परिसरात अवैध कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नियोजनबद्ध जाळे रचून दोन ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मांसाचे नमुने प्रयोगशाळेत; आरोपीवर गुन्हा दाखल
छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयित गोमांसासह हत्त्यारे जप्त केली असून, घटनास्थळावरून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले मांस तपासणीसाठी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
तालुक्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर गोमांस विक्री किंवा अवैध कत्तल खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
