वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश; जिजाऊ ब्रिगेड व वानखेडे सेंटरचा उपक्रम
साईमत /पारोळा / प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पारोळा शहरातील बसस्थानक परिसरात जिजाऊ ब्रिगेड ग्रुप व वानखेडे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून वडाच्या झाडाला विशेष महत्त्व असल्याचे सांगत त्यांनी वड, पिंपळ व निंब यांसारखे वृक्ष पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहर हिरवेगार, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारल्यास पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, प्रा. जे. बी. पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाटील, वानखेडे सेंटरचे संचालक जितेंद्र वानखेडे, नितीन वानखेडे, शिवदास चौधरी, देवेंद्र मराठे, प्रमोद अग्रवाल, नंदकिशोर अमृतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेंद्र निकम (आदित्य पेट्रोलियम), शहर तलाठी निशिकांत माने तसेच हिंगलाज प्रिंटिंग प्रेस यांचे विशेष सहकार्य लाभले. वृक्षारोपणाच्या या उपक्रमामुळे बसस्थानक परिसरातील सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
