वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर करडी नजर
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या भीषण अपघातांच्या घटनांनी प्रशासनाची चिंता वाढवली असून आता पोलिस विभागाने अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने आज विशेष व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अपघातांचे वाढते प्रमाण, त्यामागील कारणे आणि तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोलचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील महामार्ग आणि ग्रामीण भागातील अपघातांच्या घटनांचा आढावा घेत प्रशासनाने विविध स्तरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले.
एमआयडीसी परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने ट्रक चालकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालकांना सुरक्षित वाहन चालविणे, वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांनाही वाहतूक शिस्तीबाबत जागरूक केले जाणार आहे.
महामार्गालगत असलेल्या ढाबे आणि हॉटेल चालकांनाही अपघातग्रस्तांना तातडीने मदत कशी करावी, प्राथमिक उपचार आणि सीपीआरसारख्या जीवनरक्षक उपायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपघातानंतरच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत योग्य मदत मिळाल्यास जीव वाचू शकतो, या दृष्टीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची माहिती संबंधित विभागांना देऊन रस्त्यांवरील त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय वाढवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
लग्नसराईच्या काळात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई करण्यात येणार असून महामार्गांवर निष्काळजीपणे उभ्या राहणाऱ्या ट्रक चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.
अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला असून प्रत्येक पोलिस वाहनात प्रथमोपचार पेटी उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमाही हाती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आखलेली ही व्यापक मोहीम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
