सुयशाबद्दल सर्वत्र कौतुकासह होतोय अभिनंदनाचा वर्षाव
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ. प्रशांत पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रा.शीतल प्रशांत पाटील यांनी नुकतीच पीएचडी पदवी संपादन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार प्रा.शीतल पाटील यांनी विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी संपादन केली आहे. यासाठी त्यांचा An Automated Skin Lesion Analysis For Early Melanoma Detection (मेलेनोमा शोधण्यासाठी लवकर स्वयंचलित त्वचा विकृती विश्लेषण) असा संशोधनाचा विषय होता. त्यात त्या अभ्यासपूर्ण यशस्वी ठरल्या आहेत.
प्रा. शीतल पाटील यांचे शिक्षण बी. ई. (कॉम्प्युटर), एम. टेक (माहिती तंत्रज्ञान) एम.आय.टी.कॉलेज, पुणे येथे झालेले आहे. त्या २००७ पासून शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. दरम्यानच्या कालावधीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे विविध प्रकारच्या जर्नल्स, शोध पत्रिकांमध्ये १० आणि त्यापेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. दोन संशोधनात्मक पेटंट त्यांच्या नावाने मंजूर झाले असल्याची विशेष उल्लेखनीय आणि गौरवास्पद बाब आहे. प्रस्तुत शोध प्रबंधासाठी त्यांना धुळे येथील देवपुरातील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील मार्गदर्शन लाभले.
प्रा. शीतल प्रयोगशील शेतकरी गोरख पाटील यांच्या स्नुषा
उच्च विद्याविभूषित प्रा. शीतल पाटील ह्या नंदुरबार जिल्ह्यातील तिसी येथील आदर्श तथा प्रयोगशील शेतकरी गोरख आनंदा पाटील यांच्या स्नुषा आहेत. सौ.प्रा.शीतल प्रशांत पाटील यांनी मिळविलेल्या सुयशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.