साक्रीला तब्बल ३० वर्षानंतर ‘गेट टुगेदर’मुळे माजी विद्यार्थी आले एकत्र

0
13

जुन्या आठवणींना दिला उजाळा, २३ गुरुजनांचा केला सत्कार, १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग

साईमत/साक्री/प्रतिनिधी :

येथील न्यू इंग्लिश स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामधील १९९४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’ अर्थात स्नेह-संमेलन बाल आनंद नगरी, कान नदी किनारी येथे नुकतेच पार पडले. तब्बल ३० वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी ‘गेट टुगेदर’ (GTG) च्या कार्यक्रमामुळे एकत्र आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेने मोठे केले त्या शाळेसाठी एक दिवस देऊन ‘आठवण एक मौल्यवान साठवण’ ही संकल्पना राबवून ‘गेट टुगेदर’च्या माध्यमातून ‘मैत्री ही वर्तुळाकार असते, ज्याला कधीही शेवट नसतो… अशी मित्र-मैत्रिणी वणव्यामध्ये गारव्यासारखे’ असा एक नवा संदेश सर्वांनी दिला. ‘गेट टुगेदर’ला २३ शिक्षक-शिक्षिका तसेच ६५ विद्यार्थी आणि ४० विद्यार्थिनींचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक डी.पी. देवरे होते. सुरुवातीला ३० वर्षांच्या कालावधीत दिवंगत झालेले संस्थेचे, शाळेचे, विश्वस्त, पदाधिकारी, शिक्षक-शिक्षिका, वर्ग मित्र- मैत्रिणी यांचे स्मरण करुन त्यांना सामूहिकरित्या श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला व्यासपीठावर जी.एन.पाटील, ए.टी. सोनवणे, ए.के. नेरकर, आर.डी. भामरे, एस.ए. अहिरराव, राजन पवार, एस.पी. भदाणे, आर.पी. खैरनार, एस.डी. बेडसे, डी.डी. अहिरराव, आर.डी.वेंदे, डी. डी. नांद्रे, बी.ए.नांद्रे, श्रीमती एन.जी.पाटील, श्रीमती एस. बी. ठाकरे, व्ही. डी. देसले, एस.बी. नेरकर, एस. यू. सोनवणे, व्ही.एस. भदाणे, डॉ.डी.एम. भदाणे, बी. जी. थोरात, कुवर आण्णा (प्रयोग शाळा सहाय्यक) आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी सहभागी गुरुजनांचा शाल, श्रीफळ, बुके, स्मृतीचिन्ह त्यासोबतच पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे रहिवास असलेली वर्गमैत्रिण सीमा वाडीले-साठे हिने खास गुरुजनांसाठी परदेशातून आणलेल्या भेटवस्तू त्यांना व्यक्तिगत स्वरुपात सन्मानपूर्वक दिल्या.

संदीप नेरकर याने शिक्षक आणि आजच्या काळातातील शिक्षक-विद्यार्थी यांचा फरक थोडक्यात विषद केला. त्यानंतर संगीत शिक्षक आर.पी. खैरनार यांनी “छान, छान, छान आमचा बाग किती छान! फुले ही छान, फळे ही छान, पक्षी किती छान….” हे शालेय जीवनातील गीत गायिले. त्यांच्या समवेत वर्गात उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकाच सुर, ताल, लयीत गीत गाऊन पुन्हा एकदा ३०-३५ वर्ष कालावधी मागे जावून जुन्या आठवणींना जागृत केले. शालेय जीवनातील त्या शालेय गीतांतील संगीताची जादू किती अद्वितीय असते, त्याची प्रत्यक्ष अनुभूती पुन्हा एकदा सर्वांना आली.

शाळेतील कर्मवीर आप्पासाहेब बेडसे स्मारकगृह असलेल्या रंगमंचाकडे सर्व वर्ग मित्र-मैत्रिणी हे आपण शालेय जीवनात ज्याप्रमाणे शाळा सुरु होण्याच्या प्रारंभी एकत्रित येत प्रार्थना म्हणत होते. ती स्मृती जागृत करण्याचा एक यशस्वी प्रयत्न झाला. शालेय जीवनात असतांना अगदी त्याचप्रमाणे सर्व जण उंचीनुसार, एकमेकांपासून एका हाताचे अंतर घेत स्वयंशिस्तीने रांगांमध्ये सर्व विद्यार्थी स्वतंत्र अश्या स्वरुपात रांगेत उभे राहिले. पी.टी. शिक्षक व्ही.डी.देसले यांनी शिट्टीचा गजर करत व एका हातात छडी (ओली शेमटी) घेवून भूतकाळातील त्याच उत्साहात परेड ‘सावधान- विश्राम’ अशी आज्ञावली देत सर्वांना ‘फ्लॅश बॅक’मध्ये नेले. रंगमंचावर उपस्थित शिक्षकांपैकी डी.डी. नांद्रे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.डी.एम. भदाणे यांनी ‘गेट टुगेदर’च्या आयोजनाच्या संदर्भातील भूमिका विषद करत सल्ला दिला. त्यानंतर आर. पी. खैरनार, राजन पवार यांनी तबला, पेटी वाजवून श्री.खैरनार यांनी स्वरचित संगीतबध्द केलेली प्रतिज्ञा गायली. त्यानंतर परेड फैलजाव म्हणून देसले यांनी ऑर्डर दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेच्या प्रांगणातील शिक्षण घेतलेल्या पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आपापल्या वर्ग खोल्यात जावून फोटोशेसन केले.

विद्यार्थ्यांनी मनोगतात व्यक्त केले प्रेरणादायी विचार

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात वर्ग मित्र- मैत्रिणीतील शितल देसले-भदाणे, (खापर) प्रशांत बेडसे (चाकण, पुणे), योगिता भोसले (नंदुरबार), रेखा अहिरराव (पुणे), कार्तिककुमार सोनवणे (कोईम्बतूर) यांनी शालेय जीवनातील आठवणी, सध्याची शैक्षणिक स्थिती, शाळेमधील शिक्षकांनी केलेले ज्ञानार्जन, मूल्यांधारित शिक्षण, आजवरची शैक्षणिक प्रगती, बदलती सामाजिक स्थिती, जीवनात आचरणात आणावयाची मूल्ये यांसह विविध विषयांवर सकारात्मक, प्रेरणादायी विचार मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजय ठाकरे, प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

गुरुजनांचे लाभले मार्गदर्शन

यावेळी एस. ए. अहिरराव यांनी बस कंडक्टरच्या उदाहरणाच्या माध्यमातून महत्त्वाचा संदेश दिला. डी.डी. नांद्रे यांनी “कणा” या कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या कवितेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विचारांचे प्रबोधन केले. त्याचबरोबर डॉ. डी.एम. भदाणे यांनी कुटूंबाचे महत्त्व अधोरित करत संपूर्ण कार्यक्रमाविषयी व यापुढील भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर आर.पी. खैरनार यांनी “मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा” च्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले. कला शिक्षक राजन पवार यांनी त्यांच्यात असलेल्या अभिनयाच्या माध्यमातून – अभिनय सम्राट डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर यांच्या हुबेहुब आवाजातील “नटसम्राट” नाटकातील काही भाग कथन करुन सर्वांना काही काळ भावना मग्न केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बहारदार, सुमधूर स्वरात “मित्र वणव्यामध्ये… गारव्यासारखा” हे गीत गाऊन सर्वांना मित्र अन् मैत्री विषयीचे नातेसंबंध विषद केले.

गाण्यांसह नृत्याने मिळविली दाद

सांस्कृतिक कार्यकमात ‘कराओके ट्रॅक’वर विजय ठाकरे याने त्याच्या सुमधूर आवाजात १९८०-९० च्या दशकातील एकसे बढकर एक दर्जेदार फिल्मी गाणे गात त्याच्यातील गायनाच्या सुप्त कलेला उत्स्फूर्तपणे सर्वांसमोर गात दाद मिळविली. त्या सोबतच सर्वांचा लाडका मित्र शरद भालेराव याने त्याच्या अंगी असलेली नृत्यकला व कमालीच्या स्टेप्स् घेत पदतालित्य राखत नाचत सर्वांचे तुफान मनोरंजन केले. उपस्थित सर्वांनी शरदने केलेल्या नृत्याचे अर्थात डान्सचे कौतुक केले. विद्यार्थी असावा त्याची अनुभूती सर्वांना यावी म्हणून एकमेव शरद भालेराव याने कार्यक्रमाच्या सुरुवात ते शेवटपर्यंत यथेच्छ आनंद घेतला. सर्वांना कमी-अधिक प्रमाणात लाईनीवर आणि जागृत अवस्थेत आनंद दिला.

साड्या अन्‌ पाणी बॉटलचे वितरण

यासोबतच वर्ग मित्रांनी ग्रुपमधील सर्व वर्ग मैत्रिणींसाठी खास गिफ्ट म्हणून घेतलेल्या साड्यांचे वितरण केले. तसेच RETURN GIFT म्हणून ग्रुपमधील वर्ग मैत्रिणींही सर्व वर्ग मित्रांसाठी खास गिफ्ट म्हणून स्टेलनेस स्टीलच्या पाणी बॉटल्स् सर्वांना व्यासपीठाकडे बोलावून अत्यंत सन्मानपूर्वक दिल्या. साड्या आणि पाणी बॉटलच्या वितरणाची जबाबदारी वर्ग मैत्रिणी वासंती, स्वाती, जयश्री, तक्षिला यांच्यासह इतर सर्व वर्ग मैत्रिणी यांनी कामगिरी चोखपणे बजाविली.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी बंडू महाले, कुंदन देवरे,शाम वानखेडे, प्रवीण करनकाळ, सुशिल देसले, शशिकांत बेडसे, यशवंत बहिरम, योगेश भंडारी, संतोष मेहरा, दिनेश वकारे, देवेंद्र पटेल, हेमराज पवार, सचिन बोरसे, महेंद्र बोरसे, सचिन चंदेल, सचिन कांकरिया, राहुल कांकरिया, महेंद्र कुवर, दिनेश सूर्यवंशी, मनिष पंजाबी, नितीन भामरे, सचिन भोसले, प्रशांत जाधव, भूषण भोसले, सुपडू राठोड, प्रवीण हिरे, हेमंत भामरे, राजेश वाडीले, राजेंद्र नांद्रे, सुरेश चोरडीया, योगेश देसले,विकास रोहडे, नितीन साळुंखे, सचिन नांद्रे यांच्यासह सर्व वर्ग मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात ग्रुपचा चेअरमन विजय ठाकरे याने ग्रुप स्थापनेचा उद्देश ते गेट-टू-गेदर (GTG) कार्यक्रमाचे आयोजन याविषयी खुमासदारपणे, खास शैलीत व थोडक्यात मुद्देनिहाय विषद केले. सुत्रसंचलन संदीप नेरकर, सचिन कोठावदे, जितेंद्र नांद्रे, तर आभार प्रशांत पाटील, वर्षा बच्छाव-देवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here