२१ वर्षीय कर्मचारी गंभीर जखमी, परिसरात खळबळ
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
राज्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून अनेक ठिकाणी वादविवादाचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत एरंडोल तालुक्यातील म्हसावदजवळील ममताबाद येथील पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याचे सांगितल्याच्या कारणावरून दोन अज्ञात तरुणांनी २१ वर्षीय कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात तुषार गुरव (वय २१) हा पेट्रोल पंप कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी इंधनाची मागणी केली होती. मात्र कर्मचाऱ्याने साठा संपल्याने पेट्रोल देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले. यावरून संतप्त झालेल्या दोघांनी कर्मचाऱ्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
क्षणातच हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही तरुणांनी खिशातून धारदार चाकू काढून तुषार गुरवच्या पोटात वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी अवस्थेत तुषार गुरवला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यामध्ये हल्ल्याचे स्पष्ट दृश्य कैद झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांची ओळख पटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यांच्या अटकेसाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
