मासूमवाडीतील मुस्तकीम पटेलचा दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश, परिसरात हळहळ
साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
शहरातील जोशीपेठ परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे पटेल कुटुंबीयांसह संपूर्ण मासूमवाडी परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठ भागातील एका मंदिरात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले होते. मुस्तकीम हा नेहमीप्रमाणे शनिवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिरात काम करत होता. मात्र, इलेक्ट्रिक वायर जोडण्याचे काम सुरू असतानाच अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि मुस्तकीमला विजेचा उच्च दाबाचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका भीषण होता की, मुस्तकीम थेट जमिनीवर कोसळला आणि गंभीर जखमी झाला.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
हा प्रकार घडताच सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची एकच पळापळ झाली. त्यांनी तातडीने मुस्तकीमला उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ‘मृत’ घोषित केले.
रुग्णालयात नातेवाईकांचा हृदयद्रावक आक्रोश!
मुस्तकीमच्या अपघाती मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. मुस्तकीमचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. अवघ्या १९ वर्षांच्या तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्याने रुग्णालयाचा परिसर काही काळ शोकसागरात बुडाला होता.
मुस्तकीम अत्यंत गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील शहरात मसाले विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा चालवतात. वडिलांना हातभार लागावा म्हणून मुस्तकीमने वीस दिवसांपूर्वीच एका इलेक्ट्रिक ठेकेदाराकडे काम सुरू केले होते. मात्र, महिना पूर्ण होण्याच्या आतच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबाचा तरुण आणि कमावता आधार गेल्याने पटेल कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे.
दरम्यान, या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, वृत्त लिहिस्तवर पोलिसांत अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून, कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
