साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
नशिराबाद-उमाळा मार्गावरील ‘भाग्यवर्धन’ कंपनीकडून रासायनिकयुक्त व प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिक आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतली असून, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दुर्गंधीने नागरिक हैराण; जनावरांच्या मृत्यूचा आरोप
मनसे पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, स्थानिक नागरिकांनी आणि पशुपालकांनी आपल्या व्यथा मांडल्या. रासायनिक सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, या दूषित पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून, हे पाणी पिल्याने काही जनावरे दगावल्याचा खळबळजनक आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
नगरपरिषदेकडून सांडपाण्याचे नमुने लॅबमध्ये
यापूर्वी उमाळा रोड परिसरातील शेतकरी तसेच ‘देश विदेश लिकर’चे भागीदार सुरेश जुमडामल संगतानी यांनी नशिराबाद नगरपरिषदेकडे याविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.
स्थानिक तरुणांना डावलल्याने मनसेचा संताप
मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. अनेकदा तक्रारी करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदूषणाचा हा प्रश्न तातडीने न सुटल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोटे यांनी दिला. याशिवाय, संबंधित कंपनीत स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून बाहेरील मजुरांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
वारंवार होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, नशिराबाद नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने तात्काळ संयुक्त पाहणी करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
