आधी कामगारांची देणी द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार – मसाका कामगारांची मागणी

0
1

साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी

येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री झाला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी साखर आयुक्त, कामगार आयुक्त, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक तसेच कारखान्याचे प्रशासक, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

मात्र या विषयी कोणताही विचार न करता जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री केला. कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी मधुकर कारखान्याच्या सर्वच कामगारांची बैठक घेण्यात आली. त्यात कारखाना विक्री केल्यानंतर कामगारांची प्रलंबित देणी अद्यापही मिळाली नाही. त्याबाबत कामगारांशी कोणतीही चर्चा केली नाही. कामगारांना विश्वासात घेवून निर्णय व्हायला पाहिजे होते. कामगारांची थकीत देणी देण्याविषयी चर्चा करावी व सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे त्यांच्यावर अन्याय होवू नये. सर्वच कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मिळावा तसेच कामगारांची थकीत देणी विषयी चर्चा केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये अशी या बैठकीत मागणी करण्यात आली.

आमच्या या मागण्यांविषयी विचार न झाल्यास दि. २६ डिसेंबर पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आमच्या मागण्यांविषयी निर्णय न घेतला गेल्यास सर्वच कामगार कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करतील असा यावेळी निर्णय घेण्यात आला.या बैठकीला मधुकर सहकारी कारखान्याचे राष्ट्रीय कामगार संघ अध्यक्ष किरण चौधरी, सेक्रेटरी सुनील कोलते,राष्ट्रीय कामगार संघ माजी अध्यक्ष गिरीष कोळंबे,राष्ट्रीय कामगार संघ उपाध्यक्ष दामू कोळंबे, राष्ट्रीय कामगार संघ उपाध्यक्ष हेमंत इंगळे,ज्ञानदेव जावळे, वसंत पाटिल,महेश चौधरी, रवी महाजन कारखान्याचे राष्ट्रीय कामगार संघ पदाधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त व कायम हंगामी कामगार तसेच कारखान्याचे सर्वच विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here