आदिवासी सेवा मंडळाचा ११ मे रोजी सामूहिक विवाह सोहळा
सावदा ( प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील आदिवासी समाजात सलोखा आणि एकात्मतेचे प्रतीक ठरणारा आसेमं आदिवासी तडवी भील सामूहिक विवाह सोहळा यंदा ११ मे रोजी सावदा येथे पार पडणार आहे.
सलग 27 वर्षांपासून (कोरोनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता) यशस्वीरित्या आयोजित होत असलेला हा विवाह सोहळा यंदा 28व्या वर्षात पदार्पण करतो आहे. राज्यभरातील आदिवासी समाजातील नवदांपत्यांच्या जीवनाला नवीन सुरुवात देणारा हा सोहळा, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरतो आहे.
आसेमं (आदिवासी सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत या सोहळ्याच्या माध्यमातून 1830 जोडप्यांचे विवाह पार पडले संस्था वधू-वरांना कोणतीही वर्गणी किंवा देणगी न घेता विवाहबंधनात बांधते. समाजसेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेने नवदांपत्यांसाठी कपडे, संसारोपयोगी वस्तू आणि भांडी यांचे वाटप करून त्यांच्या नव्या जीवनाला सामाजिक पाठबळ दिले आहे.
सावदा येथे होणाऱ्या या मंगल सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो समाजबांधव, हितचिंतक, दानशूर दाते आणि मान्यवरांची उपस्थिती लाभते. वधूवरांची कोणतीही आर्थिक मागणी न करता पार पडणारा हा सोहळा प्रगत दिशेने वाटचाल करण्याचे द्योतक आहे. इच्छुक वधूवरांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुकांनी राजू तडवी, इरफान तडवी, अनिल तडवी, मुबारक तडवी, बिराज तडवी, रईस तडवी यांच्याशी 9860566609 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणी विनामूल्य आहे