मेहरूण क्रीडा संकुलासाठी रस्ता उपलब्ध करण्याचे आयुक्तांचे तातडीचे आदेश
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहराच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणाऱ्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या विभागीय क्रीडा संकुल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशमार्गाचा प्रश्न आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. मेहरूण परिसरातील सर्व्हे क्रमांक ३४३ येथे उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करत रस्ता उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.
जळगावमध्ये उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल हे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या पुढाकारातून साकार होत असलेल्या या प्रकल्पामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संकुलापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आणि रुंद प्रवेशमार्ग उभारणे ही प्रशासनाची प्राधान्याची बाब बनली आहे.
सध्या क्रीडा संकुलाकडे जाणारा मार्ग कच्चा असून भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता तो अपुरा ठरण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यमान रस्त्याचा वापर अधिकृतपणे क्रीडा संकुलासाठी करता यावा, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान महापौर दिपमाला काळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्रांताधिकारी विनय गोसावी, शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी परिसरातील वाहतूक, रस्त्याची सद्यस्थिती, भविष्यातील गरजा आणि प्रवेशमार्गाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
बैठकीत विभागीय आयुक्तांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता रस्त्याशी संबंधित सर्व प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर दिला. क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने दर्जेदार रस्ता ही अत्यावश्यक सुविधा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशस्त प्रवेशमार्ग उपलब्ध झाल्यानंतर क्रीडा संकुलाच्या कामालाही अधिक वेग मिळणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल. यामुळे जळगावला आधुनिक क्रीडा सुविधांनी सुसज्ज शहर म्हणून नवी ओळख मिळण्यास मदत होणार असून, विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
