सीलबंद घराची झडती अन् कोट्यवधींचा खुलासा रोख, सोने, मालमत्तेची कागदपत्रे… एसीबीच्या धाडीत कोट्यवधींचा खजिना उघड
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
अकोल्यातील लाचखोरीच्या कारवाईनंतर सुरू झालेल्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झालेल्या सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या झडतीत तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरातील कपाटे, लॉकर आणि इतर ठिकाणांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू आढळल्याने तपास यंत्रणाही अवाक् झाली.
२६ जून रोजी अकोला येथे एका प्रकरणात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना किरण चौधरी यांना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान चौधरी यांचे जळगावातील विष्णुनगर परिसरातील घर समोर आल्यानंतर तेथे शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्राथमिक टप्प्यात घर कुलूपबंद असल्यामुळे पंचांसमक्ष ते सीलबंद करण्यात आले. मात्र, काही दिवसांनी पहाटेच्या वेळी काही नातेवाईकांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश करून संभाव्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकारानंतर संबंधितांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर २ जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनिषा चौधरी यांच्या उपस्थितीत घराची पुन्हा सखोल तपासणी करण्यात आली. या तपासात १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये मूल्याच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, ३१ हजार ४१६ रुपये किमतीची चांदी, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या तसेच ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या विविध मौल्यवान घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या.
या कारवाईनंतर चौधरी यांच्या मालमत्तेचा स्रोत, उत्पन्नाशी त्याचा असलेला संबंध आणि संभाव्य बेहिशेबी संपत्तीचा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे इतर आर्थिक व्यवहारांचीही छाननी केली जात असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
