माजी विद्यार्थी जे. एस. किनगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; २ हजार विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून आनंदोत्सव
साईमत -नशिराबाद-प्रतिनिधी |
नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलचा ८२ वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. २) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा ‘बीएसएनएल’ (जळगाव) चे सेवानिवृत्त सहाय्यक महाप्रबंधक जे. एस. किनगे उपस्थित होते. किनगे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, कठोर मेहनत आणि शिस्तीचा यशस्वी मंत्र दिला.
विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवावी: योगेश पाटील
संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. “विद्यार्थ्यांनी भविष्यातही ही यशाची परंपरा कायम ठेवावी,” अशा शुभेच्छा देत त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. तर नगरसेवक वासिफ अली यांनीही संस्थेच्या शैक्षणिक कार्याची स्तुती केली.
२२ हजारांच्या बक्षिसांचे वितरण
मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचा ताळेबंद मांडला. गुणगौरव सोहळ्यात विविध दात्यांनी ठेवलेल्या ठेवींच्या व्याजातून आणि रोख स्वरूपात सुमारे २२ हजार रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट भेट देणारे डॉ. कांतीलाल नारखेडे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळेतील सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना पेढे वाटप करण्यात आले.
हे ठरले मानकरी…
दहावीत प्रथम: पूजा पाटील
द्वितीय: वनिता तळेले
तृतीय: भूमिका गायकवाड व देवयानी महाजन
विशेष गौरव: लिखित पाटील, उत्कर्षा पाटील, शर्वरी करुळे, धनंजय उघडे, दिव्या जावडे, गणेश कोडी, ललित नारखेडे, सोनाक्षी सुरवाडे, कृष्णा मोरे आणि खुशी चौधरी या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला.
शिक्षकांनी परंपरा अधिक समृद्ध करावी: जनार्दन माळी
शाळेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले. “शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करून शाळेची ही गौरवशाली शैक्षणिक परंपरा आणखी समृद्ध करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्याला संचालक प्रमिला महाजन, सुनीता पाटील, मधुकर चौबे, विनायक वाणी, ॲड. प्रदीप देशपांडे, डॉ. संदीप महाजन, भोजराज पाटील, माजी मुख्याध्यापक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
बक्षीस वाचन राजू पाचपांडे, जी. टी. पाटील आणि एन. सी. भिरूड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. -ओ. चौधरी आणि सौ. जी. एस. महाजन यांनी केले, तर जी. टी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
