जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, लग्नाच्या काही दिवसांवर असलेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार-धानोरा मार्गावरील लोय फाटा परिसरात हा अपघात घडला. Mahindra Xylo या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही रोहित आप्पा भिल आणि साजन भिल या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रोहित भिल याचे अवघ्या दहा दिवसांवर लग्न ठरले होते. घरात लग्नाची तयारी सुरू असताना तो आपल्या मित्रासोबत नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी निघाला होता. मात्र, काळाने घात केला आणि आनंदाचे क्षण दु:खात परिवर्तित झाले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त झायलो गाडीला आग लावली, त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, नंदुरबार उपनगर पोलिसांनी झायलो चालक नाजील पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शिंदे गावात सध्या शोककळा पसरली असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
