खड्डे हटवा, नागरिकांना दिलासा द्या’; रिक्षा चालक-मालक संघटनेची महापालिकेकडे मागणी
साईमत /उल्हासनगर / प्रतिनिधी :
शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलकोंडीच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता या प्रश्नावर रिक्षा चालक-मालक संघटना आक्रमक झाली आहे. शहरातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कै. रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेने येत्या ११ ऑगस्ट रोजी उल्हासनगर महापालिकेसमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून उल्हासनगर शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था, उखडलेले काँक्रीटचे भाग आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली आणि व्याप्ती लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या खराब रस्त्यांमधून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. कर भरूनही शहरवासीयांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, शहरातील समस्या कायम असताना लोकप्रतिनिधी लाखो रुपये खर्च करून गुवाहाटी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील खड्डे, तुंबलेली गटारे आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कै. रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ पाहणी दौरे आणि आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेकडून खड्डे बुजविल्याचे दावे केले जात असले तरी काही दिवसांतच रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि शहरातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकांपूर्वी तत्कालीन कलानी गटाचे नेते ओमी कलानी यांनी ‘शर्म करो, खड्डे भरो’ ही मोहीम राबवून शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि शहरातील रस्त्यांच्या समस्येची दखल राज्याच्या वरिष्ठ पातळीवरही घेण्यात आली होती.
मात्र निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला असला तरी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अद्याप कायम असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. आता रिक्षा चालकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे होणार का आणि शहरातील रस्त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
