टी-पॉईंट उड्डाणपुलावर धोकादायक खड्डे; आठ ते दहा वाहनांचे टायर फुटले
साईमत /नवी मुंबई / प्रतिनिधी:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या पनवेल-उरण मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रमुख मार्गांवरील उड्डाणपूल आणि सेवारस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. पळस्पे फाटा ते जेएनपीटी महामार्ग तसेच उरणकडून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
काही दिवसांपूर्वी पळस्पे-जेएनपीटी मार्गावरील टी-पॉईंट उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे एकापाठोपाठ आठ ते दहा वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली. अचानक टायर फुटल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनचालक आणि प्रवाशांना मदत केली. या मार्गावर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात येत आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती वाहतूक पोलिसांकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) पाठविण्यात येते. त्यानंतर प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. मात्र, ही दुरुस्ती अनेकदा तात्पुरती ठरत असून काही दिवसांतच पुन्हा रस्त्यांची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे चित्र आहे.
उरणकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मार्ग सुमारे चार वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, या मार्गावरील वहाळ उड्डाणपुलाची सध्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे आणि त्यातून ४० ते ५० मेट्रिक टन वजनाची अवजड वाहने धावणे यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच वळणांवर वाहनांच्या चाकांमुळे होणाऱ्या घर्षणामुळे रस्त्याचा टिकाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
रात्रीच्या वेळी खड्डे सहज लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या मार्गावर पथदिव्यांची संख्या वाढविणे, तसेच धोकादायक ठिकाणी ब्लिंकर दिवे बसविण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे.
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रणाची मागणी
जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वजनाची अवजड वाहने धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रभावी कारवाई होत नसल्याने रस्त्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
अपघात झाल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून रस्त्यांमधील त्रुटींचा अहवाल संबंधित यंत्रणांना देणे अपेक्षित असते. मात्र, या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे.
दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू
पनवेल शहर वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी टी-पॉईंट उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे आठ ते दहा वाहनांचे टायर फुटले होते. त्यावेळी पोलिसांनी तातडीने मदतकार्य केले. रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती त्वरित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली जाते. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तात्पुरती दुरुस्ती केली जाते.
मात्र, रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, ‘रोड फर्निचर’ची देखभाल आणि पथदिवे कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मार्गावरील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या वर्षी झालेल्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे विमानतळ मार्गावरील रस्त्यांची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.
