नागरिकांच्या धाडसामुळे दहा वर्षीय मुलीची सुटका; महापालिका कर्मचाऱ्याला अटक पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
साईमत /पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल शहरातील वाल्मीकनगर परिसरात दहा वर्षीय बालिकेला सार्वजनिक शौचालयात नेऊन डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागातील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची वेळीच सुटका झाल्याने मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी सकाळी वाल्मीकनगर परिसरात ही घटना घडली. दहा वर्षीय बालिका घराशेजारील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात खेळत असताना संशयिताने तिला हावभाव करून जवळ बोलावले. त्यानंतर तिला सार्वजनिक शौचालयात नेऊन डांबल्याचा आरोप बालिकेच्या पालकांनी तक्रारीत केला आहे. हा प्रकार लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, बालिकेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर परिसरातील काही मुले आणि तरुणांनी शौचालयाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत बालिकेची सुटका केली. त्यानंतर नागरिकांनी संशयिताला पकडून पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव हसमुख वाघेला (वय २४, रा. ठाणा नाका परिसर) असे आहे. तो पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी तो वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत रुजू झाला होता. मंगळवारी वाल्मीकनगर परिसरात स्वच्छतेच्या कामासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणी पीडित बालिकेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७४ तसेच पोक्सो अधिनियम २०१२ मधील कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांनी संशयिताला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बालिकेची वैद्यकीय तपासणी तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
