रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत… एक सूर…’ हा विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आज (दि. ३० जून) सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्रायोजित, तसेच रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ या संकल्पनेवर आधारित विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते सहभागी शाळांचा गौरव करण्यात आला:
दीपमाला काळे (महापौर)
धिरज मिनोत्रा (एनसीसी कमांडीग ऑफीसर)
कॅप्टन मोहन कुलकर्णी
अब्दुल भाई (ज्येष्ठ गांधीयन)
डाॅ. अश्विन झाला
गिरीश कुलकर्णी (अध्यक्ष, रोटरी क्लब जळगाव)
जे. के. पाटील (राज्यअध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना)
डॉ. चंद्रशेखर सिकची (माजी प्रांतपाल, रोटरी)
ॲड. सागर चित्रे (प्रकल्प प्रमुख)
सांगितीक प्रवासातून माणुसकीचा जागर
कार्यक्रमाची सुरुवात १५० वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने झाली. यानंतर ‘माणसाने माणसाशी माणसासम.. हीच अमुची प्रार्थना…’ या गीताने माणुसकीचा जागर करण्यात आला. साने गुरुजींचे ‘खरा तो एकचि धर्म…’ आणि ‘झेंडा ऊंचा रहे हमारा..’ या गीतांच्या सादरीकरणानंतर राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ ने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण नाट्यगृह राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. कार्यक्रमाचे नेटके संचालन रोटरीचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले.
”प्रत्येक कृती देशप्रेम ठरावी” – धिरज मिनोत्रा
“प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा आदर्श ठेवावा. स्वच्छता राखण्यापासून ते आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक सामान्य कृतीमधून देशप्रेमाला प्राधान्य दिले पाहिजे. बाजारात जाताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून आपला देश स्वच्छ व सुंदर ठेवण्यास हातभार लावावा.”
”स्वच्छता आणि शिस्तीतून देशभक्तीची प्रेरणा घ्या” – दीपमाला काळे (महापौर)
“या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा संदेश घेतला पाहिजे. समूहशक्तीच्या जोरावर जळगावला सुंदर शहर बनवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे. बालवयात रुजलेले संस्कारच भविष्यात उत्तम समाज घडवतात.”
कार्यक्रमात जळगाव व परिसरातील एकूण १६ शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये खालील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला:
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल
ए. टी. झांबरे विद्यालय
झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा
श्रीमती शेवंताबाई टोके विद्यालय
नंदिनीबाई मुलींचे विद्यालय
श्रीराम विद्यालय, मेहरूण
जिजामाता विद्यालय
या. दे. पाटील विद्यालय
बाहेती विद्यालय
जय दुर्गा विद्यालय
शंकुतला जे विद्यालय
पी. के. गुळवे विद्यालय
जे. जे. पंडित हायस्कूल, लोहारा (ता. पाचोरा)
या अभूतपूर्व उपक्रमाला विद्यार्थी, युवक, शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरीचे सदस्य आणि जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांसाठीच हा एक अनोखा सांगितीक आणि राष्ट्रभक्तीचा अनुभव ठरला.
