भयावह प्रकार: जंगलात परिचयाच्या मित्रासमोरच ओढवले क्रौर्य; गुन्ह्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ केला सोशल मीडियावर व्हायरल!
साईमत- जामनेर – प्रतिनिधी|
जळगाव जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर निर्जन जंगलात सामूहिक बलात्कार (गॅंगरेप) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी या घृणास्पद कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि त्यापैकी एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ समोर येताच जळगाव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून या प्रकरणातील १५ पैकी १४ मुख्य व सह-आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
२ जून रोजी घडले होते ‘ते’ काळजाचा थरकाप उडवणारे कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी देऊळगाव ते कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात घडली. पीडित ४० वर्षीय महिला तिच्या एका परिचयाच्या मित्रासोबत जात असताना, संशयित आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठले. यानंतर निर्जन जंगलाचा गैरफायदा घेत, महिलेच्या मित्रासमोरच दोन मुख्य नराधमांनी तिच्यावर बळजबरी करत सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर सह-आरोपींनी या संपूर्ण प्रकाराला रोखण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.
व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला अन् नराधम जाळ्यात अडकले
घटनेनंतर पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्यात होती. मात्र, काही दिवसांनंतर या प्रकरणातील एका संशयित आरोपीने विकृत मानसिकतेचे प्रदर्शन घडवत गुन्ह्याचे ते व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल केले. हा व्हिडिओ स्थानिक पातळीवर पसरताच जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फत्तेपूर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तातडीने गुन्हा दाखल करत रात्रीतून आरोपींची धरपकड सुरू केली.
