साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनीधी
येथून जवळच असलेल्या आमोदा येथील रहिवाशी पूजा पाटील, अरुणा तायडे, धीरज चौधरी असे तीन जीवांचे गेल्या पंधरा दिवसात अकस्मात निधन झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा गावावर शोककळा पसरली आहे.
पूजा निलेश पाटील या किडनीच्या आजाराने चार महिने झाले आजारी होत्या. पती निलेश पाटील हा नाशिक येथील कंपनीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर निलेश चे वडील सुरेश पाटील हे शेतकरी व्यवसाय करतात घरी जेमतेम शेती असल्याने व दोन मुले असल्याने त्यांनी निलेश यास उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे नोकरीस पाठवले. त्याचे लग्न लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पूजाशी लावण्यात आले.
पूजाचे आई-वडील हे आधीच मृत्यू पावलेले असून तिला भाऊ व चार बहिणी आहे. लग्नानंतर सुखाचा संसार सुरू झाला त्यांच्या संसार वेलीवर मुलगा कार्तिक वय चार वर्ष, मुलगी चित्रांशी नऊ महिने अशी दोन अपत्य झाली. मात्र नियती खेळ काही वेगळाच होता. पूजा हिची किडनी फेल झाल्याने तिला उपचारासाठी निलेश यास घर- दार सोडून वणवण फिरावे लागले निलेश याने नाशिक येथील सुयश हॉस्पिटल, गुरुजी रुग्णालय येथील ट्रीटमेंट घेऊन सोलापूर येथे सुद्धा उपचार केले नंतर गोदावरी रुग्णालय व जळगाव येथील ग्रामीण रुग्णालय असा उपचाराचा प्रवास करत पूजा हिची प्राण ज्योत अखेर मालविली. निलेश (पान 2 वर)
याला जेमतेम पगार असल्याने सर्व खर्च न परवडणारा होता. त्यांनी पत्नीला वाचवण्यासाठी नातेवाईकांकडून खर्चासाठी पैसे जमा केले तसेच पत्नी आजारी असल्याने चार महिने पत्नी बरोबर राहिल्याने नोकरी सुद्धा गेली. आता लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली.
दुसऱ्या घटनेत 30 तारखेला धीरज चौधरी याचा सुद्धा एक्सीडेंट मध्ये मृत्यू पावला त्याची आई लहानपणीच वारल्याने वडील शशिकांत चौधरी यांनी मोलमजुरी करून त्यास आयटीआय पर्यंत शिकवीले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांचा सुद्धा म्हातारपणाचा आधार गेला.
तिसऱ्या घटनेत आमोदा येथील अरुणा पंकज तायडे ही तरुणी देखील पंधरा दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती. तिचा पती पंकज हा छोटेसे किराणा दुकान चालवतो तर पत्नी अरुणा आरोग्य केंद्रामध्ये गटप्रवर्तक म्हणून कार्यरत होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही प्राथमिक शिक्षण घेत असून तायडे परिवाराचा उदरनिर्वाह हा पती – पत्नी मिळून दोन्ही जण चालवत होते. पंकजची आई सुद्धा आजारी असून तिची घरगुती ट्रीटमेंट डॉक्टरांकडून चालू आहे. परंतु नियतीचा खेळ काही औरच होता अरुणाचाअपघात झाला व शेवटी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्त्यूशी असलेली तिची झुंज संपत तिचा अखेर मृत्त्यू झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर गावात तीन जीव गेल्याने आमोदा गावात शोककळा पसरली आहे.