एनएचएआयच्या (NHAI) कारभाराला वैतागले लोकप्रतिनिधी; प्रशासनाच्या अनास्थेविरोधात मध्यरात्री टोल प्लाझा केला बंद
साईमत -जळगाव / नशिराबाद- प्रतिनिधी |
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अत्यंत बेजबाबदार आणि धिम्या कारभाराविरोधात अखेर नशिराबादमधील लोकप्रतिनिधींचा उद्रेक झाला. वारंवार निवेदने, स्मरणपत्रे आणि बैठकांनंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या नशिराबाद नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी मध्यरात्री थेट नशिराबाद टोल प्लाझा गाठत टोल वसुली बंद पाडली.
नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक लालचंद पाटील आणि बापू बोढरे यांच्या नेतृत्वाखाली हे अचानक आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी टोलचे बॅरिअर्स डाऊन करत वाहनांची टोलमुक्ती केली. त्यामुळे महामार्गावरील टोल वसुली काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी, जिल्हाधिकाऱ्यांना फोन
आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी आंदोलनस्थळी संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. शनिवारी सकाळीच संबंधित NHAI अधिकारी आणि प्रशासनासह घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले. या ठोस आश्वासनानंतर लोकप्रतिनिधींनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आणि टोल वाहतूक पूर्ववत झाली.
बोगद्याला तलावाचे स्वरूप: पावसाने नशिराबाद-तरसोद मार्गावरील लहान बोगद्यात ३ ते ४ फूट पाणी साचत आहे. पाण्याखालील स्पीड ब्रेकर्स दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. शाळकरी मुले आणि नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे.
स्थानिकांवर टोलची सक्ती अन् दादागिरी: टोल नाक्यावरील काही परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांशी अरेरावी केली जाते. स्थानिक वाहनांना सवलत देण्याऐवजी टोलची सक्ती केली जात असल्याचा आरोप आहे.
निकृष्ट नियोजन: अतिक्रमण न हटवता बांधलेली गटारे, अपुरा सर्व्हिस रोड आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महामार्गावर ठिकठिकाणी तलाव साचत आहेत.
”आमची सहनशीलता संपली आहे!”
“पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली होती. त्यात सर्व प्रश्न मांडले. मात्र NHAI च्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जिवाची काहीही फिकीर नाही. आम्ही नागरिकांना काय उत्तर द्यायचे? म्हणूनच रस्त्यावर उतरावे लागले.”
— योगेश पाटील, नगराध्यक्ष, नशिराबाद
लोकप्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या
काझी पेट्रोल पंपाजवळ अंडरपास: नशिराबाद शहरात सुरक्षित प्रवेशासाठी काझी पेट्रोल पंपाजवळ तात्काळ अंडरपास उभारावा.
लाइट्स अन् निवारा शेड: तरसोद उड्डाणपूल ते टोल नाक्यादरम्यान हायमास्ट रोडलॅम्प आणि जळगाव खुर्ददरम्यान प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावी.
पाण्याचा निचरा: चौबे पेट्रोल पंप परिसर व सर्व्हिस रोडवरील पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी सोय करावी.
स्थानिकांना टोलमाफी: नशिराबाद परिसरातील स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्ण सूट मिळावी आणि अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.
…तर गाठ गाठोड्याशी! (इशारा)
शनिवारी प्रशासनाकडून होणाऱ्या पाहणीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही किंवा लेखी ठोस आश्वासन मिळाले नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आणि बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा नशिराबादच्या लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे.
