साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
सुनासगाव रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याची घटना घडली. सुदैवाने, शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार पावसामुळे भरला नसल्याने परिसरात गर्दी नव्हती आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
आठवडी बाजार रद्द झाल्याने टळली जीवितहानी
दर शुक्रवारी या शाळेच्या खालील बाजूस आठवडी बाजार भरतो. येथे भाजीपाला व इतर विक्रेत्यांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी संततधार पावसामुळे बाजार भरला नाही. याच वेळी इमारतीचा भाग खचला. जर नेहमीप्रमाणे गर्दी असती, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
अधिकृत मंजुरी असूनही पाडकामात दिरंगाई
विशेष म्हणजे ही इमारत पाडण्याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश आणि मंजुरी आधीच मिळालेली आहे. शासन निर्णय (क्र. जिपशा-२०२५/प्र.क्र.८३/१२४७०५०/आस्था-१५) व २०१२ च्या परिपत्रकानुसार जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ठराव क्र. ६९० नुसार नशिराबाद येथील या तीन धोकादायक वर्गखोल्यांच्या निर्लेखनास (पाडण्यास) अधिकृत मान्यता देण्यात आली होती. तरीही ही इमारत आजही उभी असल्याने प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालकांमध्ये भीती, तातडीने कारवाईची मागणी
या जीर्ण इमारतीच्या शेजारीच नियमित शैक्षणिक उपक्रम सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात उर्वरित भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. “प्रशासन नक्की कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी ही इमारत तातडीने पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पालकांनी केली आहे.
