साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
ना डीजे…ना बँड… कीर्तन श्रवणातून ‘शुभमंगल’ पार पडल्याने हा विवाहसोहळा समाजाला दिशा देणारा ठरला आहे. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात विवाहसोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, शेंदुर्णीचे गोविंद अग्रवाल यांच्यासह राज्यातून ६० ते ७० कीर्तनकार महाराज उपस्थित होते. आगळ्यावेगळ्या ठरलेल्या विवाहसोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा गावचे भगवान पुंडलिक चौधरी यांचा चिरंजीव युवा कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज चौधरी (माजी विद्यार्थी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची) आणि जामनेर तालुक्यातीलच रोटवदचे ईश्वर श्रावण सोन्ने यांची ज्येष्ठ कन्या जयश्री यांचा विवाहसोहळा आगळावेगळा आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.
नाचणखेडा गावातील आत्मा रामानंद ब्रह्मचारी (वृंदावन) यांच्या प्रेरणेने अविनाश महाराजांनी समाजासमोर एक लग्न सोहळ्याचा आदर्श ठेवला. अविनाश महाराजांनी स्वतःच्या लग्नाज बँड न लावता हळद लागल्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळेत ह.भ.प. पारस महाराज जैन बनोटिकर यांचे सुश्राव्य कीर्तन ठेवले होते. या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार महाराजांनी लग्न सोहळा कोणत्या पद्धतीने करावा हे कीर्तनाच्याद्वारे पटवून दिले. श्रोते मंडळीही कीर्तन ऐकून आनंदित झाले. किर्तन केवळ लोकांसाठी न ठेवता स्वतः ‘वर’ अविनाश महाराज आणि ‘वधू’ जयश्री यांनी समोर बसून कीर्तनाचे श्रवण केले.
विवाहाच्या दिवशी सकाळी ह.भ.प. शरद महाराज, सुधन्वा महाराज, निवृत्ती महाराज, गोपाल महाराज, योगेश महाराज, महेश महाराज रासवे त्याचबरोबर महामनी अगस्ती ऋषी महाराज, वारकरी शिक्षण संस्था, सोयगाव, रोटवद येथील बालभजनी मंडळींनी टाळ, मृदंग, विना या वारकरी संप्रदायाच्या वाद्यांवर वर आणि वधूला लग्न मंडपात आणले. पुरोहित बबन जोशी पंढरपूरकर आणि केदार जोशी नाचणखेडेकर यांनी मंत्रघोषाद्वारे लग्न सोहळा आनंदात पार पडला.
यांची लाभली उपस्थिती
विवाहसोहळ्याला गुरु बाजीराव महाराज चंदिले (सचिव, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची), गुरु उल्हास महाराज (अध्यापक, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची), गुरु नरहरी महाराज चौधरी (सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ), मठाधिपती गुरु गोविंद महाराज चौधरी, गुरु रवींद्र महाराज हरणे, कन्हैया महाराज राहेरेकर, गजानन महाराज वरसाडेकर, धनंजय महाराज अंजाळेकर, परमेश्वर महाराज गोंडखेलकर, संभाजी महाराज मेहुणकर, सद्गुरु जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी महाराज मंडळी, नाचणखेडाचे सरपंच, पोलीस पाटील, युवानेते हर्षल चौधरी, पाळधीचे विद्यमान सरपंच, माजी सरपंच कमलाकर पाटील, डॉ.मनोहर पाटील, श्रीराम ग्रुप नाचणखेडा, संत गजानन महाराज संस्थान, नांद्रा प्र.लो. यांच्यासह नाचणखेडा परिसरातील पाच ते सहा हजार भाविकांची उपस्थिती लाभली.