महापौरांच्या हस्ते पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात मंदिर निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिका आणि समर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात निर्माल्याचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “निर्माल्य संकलन व व्यवस्थापन प्रकल्पा”चा शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विशेष निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला आधुनिक पर्यावरण संवर्धनाची जोड देत, मंदिरांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नदी-नाल्यांमध्ये निर्माल्य टाकण्याची समस्या कमी होऊन पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार आहे.
श्रीराम मंदिरातून उपक्रमाची सुरुवात
रथ चौक येथील प्राचीन श्रीराम मंदिर संस्थान येथे या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते निर्माल्य संकलन रथाचे पूजन करून या मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. पूजनानंतर रथ जुने जळगाव येथील विठ्ठल मंदिराकडे रवाना झाला आणि पुढे शहरातील विविध मंदिरांमध्ये निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येणार आहे.
या प्रसंगी महापौर दीपमाला काळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, स्थायी समिती सदस्य कल्पेश सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, पियूष कोल्हे, अमित काळे, स्वीकृत नगरसेवक नरेंद्र सोनवणे, हर्षल मावळे तसेच महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील यांच्यासह समर्पण संस्थेच्या चेतना नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, संदीप ढंढोरे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा ठोस प्रयत्न
या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मंदिरांमधून निर्माण होणारे निर्माल्य पवित्रता राखून वैज्ञानिक पद्धतीने संकलित करणे आणि त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणे. यासाठी “पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा” ही संकल्पना पुढे राबविण्यात येणार असून, संकलित निर्माल्याचा योग्य प्रक्रियेद्वारे पुनर्वापर केला जाणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने विशेष निर्माल्य संकलन रथ शहरातील विविध मंदिरांमध्ये नियमित फिरून निर्माल्य गोळा करणार आहे. नागरिकांनी तसेच मंदिर प्रशासनाने निर्माल्य इतरत्र न टाकता मंदिर परिसरातच जमा करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहरात सकारात्मक प्रतिसाद
या उपक्रमामुळे शहरात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होणार असून धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारा हा उपक्रम जळगावसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
