१२ ऑगस्टपासून सुधारित दरांची अंमलबजावणी; स्थानिकांसाठी ३६० रुपयांचा मासिक पास
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून जिल्ह्यातील सबगव्हाण आणि नशिराबाद टोल नाक्यांवर १२ ऑगस्टपासून सुधारित पथकर दर लागू करण्यात आले आहेत. वाहनांच्या प्रकारानुसार एकेरी तसेच परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आल्याने महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खर्चात बदल होणार आहे.
तरसोद-फागणे महामार्ग क्रमांक ५३ वरील सबगव्हाण टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर १७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी २५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांना एकेरी प्रवासासाठी २७० रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ४०५ रुपये मोजावे लागणार आहेत.
दोन धुरीच्या ट्रक आणि बससाठी एकेरी प्रवासाचा पथकर ५६५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ८५० रुपये आहे. तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी अनुक्रमे ६२० आणि ९३० रुपये आकारले जातील. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांसाठी एकेरी प्रवासाला ८९० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १ हजार ३३३ रुपये पथकर राहणार आहे. सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा दर १ हजार ८५ रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी १ हजार ६२५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
नशिराबाद टोलवरही दर निश्चित
तरसोद-चिखली राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यावरही सुधारित पथकर दर लागू झाले आहेत. कार, जीप, प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एकेरी प्रवासाला ११५ रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी १७० रुपये आकारले जातील. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी हे दर अनुक्रमे १८५ आणि २८० रुपये आहेत.
दोन धुरीच्या ट्रक व बससाठी एकेरी प्रवासाला ३९० रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ५८० रुपये द्यावे लागतील. तीन धुरीच्या व्यावसायिक वाहनांसाठी अनुक्रमे ४२५ आणि ६३५ रुपये पथकर निश्चित करण्यात आला आहे. चार ते सहा धुरीच्या जड वाहनांसाठी एकेरी प्रवासाला ६१० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी ९१० रुपये आकारले जाणार आहेत. सात किंवा त्यापेक्षा अधिक धुरीच्या अवजड वाहनांसाठी हे दर अनुक्रमे ७४० आणि १ हजार ११० रुपये राहतील.
स्थानिक वाहनधारकांसाठी दिलासा
दोन्ही टोलनाक्यांच्या २० किलोमीटर परिसरात राहणाऱ्या स्थानिक गैरव्यावसायिक वाहनधारकांसाठी मासिक पासची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. पात्र वाहनधारकांना ३६० रुपयांत मासिक पास घेता येणार आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र पथकर भरण्याची गरज राहणार नाही.
दरम्यान, सुधारित दरांची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी जुन्या आणि नव्या दरांमधील नेमका फरक किती आहे, याची तुलनात्मक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, १२ ऑगस्टपासून सबगव्हाण आणि नशिराबाद या दोन्ही टोलनाक्यांवर नव्या पथकर दरानुसार वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी प्रवासापूर्वी आपल्या वाहनाच्या प्रकारानुसार लागू असलेला पथकर लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे.
