गटारी तुंबल्या, पाणी गोठ्यात शिरले,डासांचा उपद्रव वाढला दरवर्षी तीच समस्या, तरी उपाय नाही; कायमस्वरूपी उपायांची मागणी
साईमत /यावल / प्रतिनिधी :
तालुक्यातील दहिगाव व परिसरात मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सावखेडासिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये पुन्हा पावसाचे पाणी शिरले आहे. गोठ्यांमध्ये पाणी साचल्याने गुरांचा चारा पूर्णपणे भिजला असून, पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मागील अतिवृष्टीच्या काळातही याच ठिकाणी पाणी शिरल्याची घटना घडली होती. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दहिगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते, गल्लीबोळ तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सावखेडासिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांकडे जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी थेट गोठ्यांमध्ये शिरत आहे. त्यामुळे गोठ्यांमध्ये साठवून ठेवलेला गुरांचा चारा भिजून खराब होण्याची वेळ आली आहे. पशुधनासाठी कोरडी जागा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या समस्येबाबत संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही समस्या मांडण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तडवी यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली होती. मात्र, हे काम ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीकडून हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीला वैतागले आहेत.
गटारीमधून वाहणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ओव्हरफ्लो झालेले पाणी आजूबाजूच्या परिसरात साचत आहे. गटारीचा उतार योग्य नसल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी गोठ्यांकडे वस्तीच्या दिशेने वळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराने बांधलेल्या गटारीची पाहणी करून तिचा उतार दुरुस्त करावा आणि पावसाचे पाणी तातडीने वाहून जाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
पाणी साचून राहिल्यामुळे परिसरात डासांचा उपद्रवही वाढला असून, दुर्गंधी आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी त्वरित बाहेर काढून परिसराची स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दहिगावातील सुरेश आबानगर परिसरातही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून, तेथे अक्षरशः पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. या पाण्याचा तातडीने निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येवर तात्पुरत्या उपाययोजना न करता ग्रामपंचायत व संबंधित विभागांनी संयुक्तपणे पाहणी करून पाणी निचऱ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, अशी जोरदार मागणी दहिगाव ग्रामस्थांनी केली आहे.
