घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
साईमत न्यूज नेटवर्क –
डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात घर बांधकामाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत ही हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात प्रताप चौधरी आणि आरोपी रोहित शेलार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घर बांधकामाच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आज दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात प्रताप चौधरी गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला.
या प्रकरणी आरोपी रोहित शेलार हा हल्ल्यानंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली. पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे खंबाळपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
