Constitution In The Country : देशात संविधान सुरक्षित ठेवण्याची गरज : श्रीधर अंभोरे

0
12

संविधान सन्मान संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

भारत देश स्वतंत्र आहे. पण देशातील वंचित, गोरगरिबांचे स्वातंत्र्य व्यवस्थेने हिरावून घेतले आहे. त्यामुळे देशाचे संविधान सुरक्षित ठेवणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले. ते संविधान सन्मान संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते.

स्वागताध्यक्ष करीम सालार यांनी दोन दिवसीय संमेलनामुळे संविधानाविषयी अनेक नवे पैलू शिकता आले असल्याचे सांगत ‘विचारांची हृदय ते हृदय देवाणघेवाण झाली’ असे नमूद केले. संविधान तज्ज्ञ जयसिंग वाघ यांनी २००८ पासून संविधान दिवस साजरा करण्याची सुरूवात कशी झाली, त्याचा उल्लेख करत ‘संविधानाच्या पुनर्विलोकनाची गरज नाही’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच ‘आंबेडकरी आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी हातात हात घालून संमेलन यशस्वी केले,’ असेही त्यांनी सांगितले. संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त संविधानाची ओळख जनमानसात व्हावी, म्हणून जळगाव येथे २९-३० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनात विविध १४ ठराव करण्यात येऊन ठरावांचे डॉ. मिलिंद बागुल यांनी वाचन केले.

मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे म्हणाले की, २००७ मध्ये पहिली संविधान रॅली काढली. तेव्हापासून संविधान सन्मानासाठी सातत्याने काम करीत आहे. यापुढे प्रजासत्ताक दिन दुप्पट ताकदीने साजरा करणार आहोत. तसेच प्रत्येकाने स्वतःच्या कामाचे ऑडिट करावे आणि किमान ५० संविधानवादी नागरिक तयार करण्याचा संकल्प घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवराम शिरसाट संकलित ‘आठवणी संमेलन’ संकलनाचे प्रकाशन करण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीताठी महेंद्र केदार, चेतन नन्नवरे, जगदीश सपकाळे, प्रा. प्रीतीलाल पवार, ॲड. आनंद कोचुरे, ॲड. आकाश सपकाळे, संध्या तायडे, निलू इंगळे, दिलीप सपकाळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे तर आभार बापूराव पानपाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here