चिमुकल्यांचा पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग; विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेने वेधले लक्ष
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, नशिराबाद येथे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा हे दोन्ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्याचा विशेष आनंद लुटला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत आकर्षक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग गायन आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखीची भव्य मिरवणूक काढली. या सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्यांच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
पालखी सोहळ्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. सर्व शिक्षकांना गुलाबाचे फूल अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून त्यांच्यातील संस्कार, प्रेम आणि गुरुजनांप्रती असलेल्या आदराचे सुंदर दर्शन घडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता कुमावत मॅडम, धनश्री लोखंडे मॅडम, दीपाली पाटील मॅडम, कोमल पाटील मॅडम, अश्विनी माळी मॅडम, निकिता मॅडम आणि मोनिका पाटील मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि गुरुजनांचा आदर करण्याचे महत्त्व शिकायला मिळाले. शाळेच्या या स्तुत्य व अभिनव उपक्रमाचे पालकवर्ग आणि उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
