पाचोरा येथील डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित!
साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील लोहारा (ता. पाचोरा) येथील रहिवासी डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना यंदाचा मानाचा ‘नियतीचे चक्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या संकल्पनेतून दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. चौधरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे २१ जून रोजी एका विशेष सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला. ‘दिव्याज फाउंडेशन’ आणि ‘भारतीय जैन संघटना’ (BJS) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
’दादाश्री विश्व ग्रुप’च्या कार्याची दखल
डॉ. प्रीतीश चौधरी हे *’दादाश्री विश्व ग्रुप’*चे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच निरंतर आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत २०२६ सालच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
समाजासाठी काम करण्याचे बळ मिळाले!
“हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळाले आहे. समाजातील शोषित, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
— डॉ. प्रीतीश चौधरी (पुरस्कार विजेते)
