नशिराबाद नगर परिषदेची तत्पर कारवाई; ‘साईमत‘चा ग्राउंड रिपोर्ट
साईमत नशिराबाद | प्रतिनिधी
नशिराबाद येथील ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील भागातील ‘भाऊंच्या उद्याना’कडे जाणाऱ्या चिखलमय रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण होणाऱ्या चिखलाच्या साम्राज्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते. या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि नगर परिषदेच्या माध्यमातून रस्त्याची दुरुस्ती करून घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला.
पावसाळा सुरू झाला की या परिसरातील रस्त्याची अवस्था दयनीय होत असे. शाळेत जाणारे लहान मुले, त्यांना सोडवायला येणारे पालक आणि स्थानिक नागरिकांना चिखल तुडवतच ये-जा करावी लागत होती. अनेकदा घसरून पडण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी दीर्घकाळापासून होत होती.
अन् लोकप्रतिनिधींनी स्वतः मैदानात उतरून घेतला ‘फॉलोअप’
या समस्येची तीव्रता लक्षात घेऊन नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी केवळ आदेश न देता, स्वतः या कामात लक्ष घातले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट सूचना देऊन कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, प्रशासनानेही तत्परता दाखवत रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे आता शाळकरी मुलांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर झाला आहे.
उर्वरित रस्त्यांची कामेही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणार: योगेश पाटील
”शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना नगर परिषदेचे पहिले प्राधान्य आहे. या परिसरातील उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जातील. शहर विकासात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून, प्रशासनाने कामे सुरू असताना नागरिकांनी थोडा संयम ठेवावा.”
— योगेश पाटील, नगराध्यक्ष, नशिराबाद नगर परिषद.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर नगर परिषदेने तातडीने तोडगा काढल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. रस्ता सुटसुटीत झाल्यामुळे पालक वर्ग, दोन्ही शाळांचे प्रशासन आणि परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांचे विशेष आभार मानले आहेत.
साईमत विशेष टीप: पावसाळ्यातील रस्त्यांची दुरवस्था ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बनत चालली होती, त्यावर नशिराबाद नगर परिषदेने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.
