पालकमंत्री गुलाबराव पाटील, संजय सावकारेंच्या गाडीसमोरच ठिय्या; सोमवारपासून मैदान खुले करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरात आज क्रीडा मैदान आणि तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न थेट रस्त्यावर आला. पोलीस भरतीच्या सरावासाठी हक्काचे मैदान उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी थेट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुख्यालयाच्या परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली आणि पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पालकमंत्र्यांनी गाडीतून उतरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि सोमवारपासून मैदान खुले करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस मुख्यालयात आज एका शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे हे उपस्थित राहणार होते. मंत्र्यांचा ताफा जसा पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळ पोहोचला, तसा आधीच दबा धरून बसलेल्या पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी ‘ताफा’ रोखला. ‘मैदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला.
विद्यार्थी आक्रमक होण्याचे कारण ?
गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी हक्काचे मैदान मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष होता. मैदानाअभावी सरावात खंड पडत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दाद मिळत नसल्याने, अखेर विद्यार्थ्यांनी थेट मंत्र्यांसमोरच आपला संताप व्यक्त करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.
वाहनांचा ताफा अडवल्याचे आणि विद्यार्थ्यांचा संतप्त मूड पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आणि आमदार सुरेश भोळे यांनी तत्परता दाखवली. त्यांनी सुरक्षारक्षकांना बाजूला करत थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले. “येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदान खुले करण्यात येईल,” असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा राग शांत झाला आणि त्यांनी आंदोलन मागे घेतले.
