महापौर दीपमाला काळे यांची प्रस्तावित सबस्टेशन जागांची प्रत्यक्ष पाहणी
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (दि. ६ मे) महावितरणच्या प्रस्तावित सबस्टेशनसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या विविध जागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
महापौरांनी शहरातील निवडलेल्या विविध ठिकाणी भेट देत त्या जागांची भौगोलिक स्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यात सबस्टेशन उभारताना उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील वीजवितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची मानली जात आहे.
या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी, जागेची उपयुक्तता आणि स्थानिक पातळीवरील अडथळे याबाबत माहिती दिली. सबस्टेशन उभारणीसाठी आवश्यक असलेल्या निकषांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे विजय मराठे, विद्युत विभागाचे सुमित पाटील तसेच महावितरणचे अधिकारी जयदीप साळी आणि वाणी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील वीजपुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी महापालिका आणि महावितरण यांच्यात समन्वय वाढवून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
