अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
साईमत/जळगाव / प्रतिनिधी :
शहरातील गेंदालाल मिल परिसरात सोमवारी सकाळी एका भंगार दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आगीमुळे दुकानातील किरकोळ साहित्याचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील फर्निचर दुकान थोडक्यात बचावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरातील भोंग्याजवळ महानगरपालिकेचे मार्केट असून, येथील दुकान क्रमांक ८७ मध्ये निसार खान यांचे भंगार दुकान आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी धावाधाव करत अग्निशमन विभागाला माहिती दिली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या वेगवान आणि सतर्क कामगिरीमुळे शेजारी असलेल्या फर्निचर दुकानापर्यंत आग पोहोचण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
या आगीत भंगार दुकानातील काही किरकोळ साहित्य जळून खाक झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, प्रभारी मुख्य अग्निशमन अधीक्षक अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक युसुफ पटेल तसेच फायरमन सौरभ चित्ते, विठ्ठल पाटील, तेजस बडगुजर, पन्नालाल सोनवणे, अनिल गायकवाड, गौरव पाटील आणि विशाल पाटील यांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्थानिक नागरिकांनीही यावेळी मदतकार्यामध्ये सहकार्य केले.
