हरिनामाच्या गजरात दिव्य सोहळा; आकर्षक शृंगार, कीर्तन आणि महाप्रसादाने भाविक मंत्रमुग्ध
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील इस्कॉन मंदिरात रविवारी ‘श्री श्री राधाकृष्ण आंबा महोत्सव २०२६’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवात श्री श्री राधाकृष्ण तसेच श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई यांचा तब्बल २०० किलो रसाळ आंब्यांनी नयनरम्य शृंगार करण्यात आला. विविध रंग, सुगंध आणि आकारांच्या आंब्यांनी सजलेल्या देवमूर्तींचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा हंगाम आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाल्याने या महोत्सवाला विशेष आकर्षण लाभले. मंदिर परिसर आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि हरिनामाच्या अखंड गजराने भारावून गेला होता. भगवान श्रीकृष्णांना विविध दर्जेदार आंब्यांचा भोग अर्पण करण्यात आला. आंब्यांच्या अनोख्या सजावटीने साकारलेले श्री राधाकृष्णांचे रूप भाविकांच्या मनाला विशेष भावले. दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी या शृंगाराचे मनापासून कौतुक करत भक्तिभावाने दर्शन घेतले.
महोत्सवानिमित्त दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. हरिनाम संकीर्तन, भक्तीगीत आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर रंगलेल्या कीर्तनामुळे मंदिर परिसरात भक्तीरसाची अनुभूती निर्माण झाली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कृष्णनामात तल्लीन होत आनंद लुटला.
यावेळी आयोजित विशेष प्रवचनात आंबा महोत्सवाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील उत्सवांचे स्थान, भगवान श्रीकृष्णांविषयीची भक्ती आणि सनातन परंपरेचे जतन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या सोहळ्याला धार्मिकतेसोबत वैचारिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानही लाभले.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ कायम होती. महोत्सवाबाबत माहिती देताना इस्कॉन मंदिराचे पार्थ सारथी दास प्रभू यांनी सांगितले की, सुमारे ५२५ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील ‘आम्रघाट’ येथे श्री चैतन्य महाप्रभूंनी यांनी आपल्या भक्तांसमवेत पहिला आंबा महोत्सव साजरा केला होता. त्याच परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने जळगावातील इस्कॉन मंदिरात हा दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला.
श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळालेल्या या आंबा महोत्सवाने जळगावकर भाविकांच्या मनावर अविस्मरणीय छाप उमटवली.
