साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
शहरातील नीमवाडी चौकातून दोन मुख्य मार्ग जात आहे. रेल्वे स्टेशन रोड व सिनेमा रोडवर वाहतूक जास्त असल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण काढून एकेरी मार्ग करण्यासाठी अनेक नागरिकांची मागणी आहे. याकडे न.प.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
निमवाडी चौकातून दोन मुख्य रोड अरुंद असल्यामुळे याठिकाणी बाजाराच्या दिवशी वाहन धारकांना आणि पुरुष व स्त्रिया यांना बाजारात ये-जा करणे जिकरीचे होत आहे. यामुळे स्त्रियांना धक्का लागून वाद घडलेले आहे. यामध्ये अनेकवेळा गटबाजीने भांडणही होताना निर्दशनास येत आहे. याशिवाय स्थानिक ठिकाणच्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या समोर अतिक्रमण वाढविल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना रस्त्यावरून अवागमन करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
प्रत्येक दिवशी बाजारात अनेकवेळा ट्राफिक जाम झाल्याचे चित्रही निदर्शनात आले आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक ठिकाणचे नागरिक यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून नगरपरिषद प्रशासन यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा एखाद्या वेळेस मोठ्या घटनेला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
‘नो पार्किंग झोन’ होणे गरजेचे
निमवाडी चौकात वर्दळ वाढली आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी येत असलेले ग्राहक आपली वाहने दुकानासमोर व भर रस्त्यातच उभी करतात. हटविण्यास सांगितले तर शाब्दिक वाद घालतात. तसेच मुख्य चौकातून दोन मुख्य रस्ते असल्यामुळे ट्रॅफिकही जाम होत असते. म्हणून याठिकाणी एकपदरी रस्ता व एकेरी वाहतूक तसेच नीमवाडी चौक परिसर ‘नो पार्किंग झोन’ होणे अत्यंत गरजेचे असल्याचे दुकानदार तथा रहिवासी डॉ.अशोक नाहर यांनी सांगितले.