मातंग समाजाच्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिस प्रशासनाविरोधात संताप
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी
उमाळी (ता. मलकापूर) येथील अनुसूचित जातीतील एका महिलेवर व तिच्या कुटुंबीयांवर कथित अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांनी तक्रार योग्य पद्धतीने नोंदवून घेतली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ९ जुलै रोजी उमाळी येथे अनुसूचित जातीतील एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिला, तिची आई, कुटुंबातील इतर महिला आणि अल्पवयीन मुलींनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.
मात्र, फिर्यादींकडून सांगितलेल्या सर्व बाबी, आरोपींची नावे आणि घटनेचे संपूर्ण स्वरूप तक्रारीत नमूद न करता पोलिसांनी स्वतःच्या पद्धतीने तक्रार लिहून घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे मूळ घटनेचे गांभीर्य कमी झाल्याने फिर्यादी पक्षावर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर श्रावण गायकवाड, धोत्रे, ज्योती गायकवाड, निर्मला गायकवाड, लक्ष्मीकांत जेठोर, भारती गायकवाड, पूजा गायकवाड, अनिल टप, अमरदीप कांबळे, अमरजित राजपूत, अनिल राजपूत, विजय तांबे, दीपक सातव, समर्थ गायकवाड, आकाश बोरले, पप्पू ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
