‘एक लाख द्या, दहा लाख घ्या’चा डाव फसला; मलकापुरात दोघांविरुद्ध गुन्हा
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी
अल्पावधीत मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आणखी एक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. एक लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल दहा लाख रुपये देण्याचे सांगून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शहरातील चाळीसबिगा परिसरात ९ जुलै रोजी घडली.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला मोठ्या रकमेचे आमिष दाखवत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याच्याकडून पैसे उकळून बनावट नोटा देत फसवणूक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाशचंद गोरीलाल कुशवाह (वय ३०, रा. हराई पंचायत, निवारी, ता. छत्तरपूर बारी, मध्य प्रदेश) यांना दोन अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास त्याच्या बदल्यात दहा लाख रुपये मिळतील, असे सांगितले. मोठ्या आर्थिक फायद्याच्या या आमिषाला बळी पडून कुशवाह यांनी आरोपींवर विश्वास ठेवला.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून ८० हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर दहा लाख रुपयांच्या बदल्यात त्यांनी ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या बनावट नोटा दिल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुशवाह यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अप क्रमांक ५०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) व ३(५) अंतर्गत दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कमी वेळेत मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या व्यवहारात कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
