साईमत न्यूज नेटवर्क –
पुण्यातील हडपसर परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी वेगाने तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. सात तासांचा टायमर लावलेली संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित स्फोटक निकामी केले.
घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालय परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. या तपासात एका दुचाकीस्वार व्यक्तीने पार्किंगमध्ये संशयास्पद वस्तू ठेवून निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा आधार घेत काही तासांतच संशयिताला ताब्यात घेतले. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून या कटामागील नेमके कारण शोधले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेली व्यक्ती आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) संयुक्तपणे केला जात आहे. बॉम्बमध्ये वापरण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या, त्यामागचा उद्देश काय होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता प्रशासनाकडून धक्कादायक उत्तर देण्यात आल्याची माहिती समोर आली. “रुग्णालयात अनेक लोक येत असतात. प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही. संबंधित व्यक्ती ओपीडी बंद झाल्यानंतर आली होती. प्रत्येकाची बॅग तपासणे शक्य नसते,” असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिल्याचे समजते.
या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू आहे.
